सातारा – रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने, त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सचिवपदी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी, कर्मवीर पुण्यतिथीदिनी 9 मे रोजी निवड केली जाते. सचिवपदावर नव्याने कोणालाही संधी देण्यात आलेली नाही. डॉ. शिवणकर यांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन सचिवाची निवड सहा महिन्यांनंतर केली जाणार आहे, तर कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्षाची निवड 27 मे रोजी पुण्यात होणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सुतोवाच शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार आगामी काळात सचिवपदावर साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख किंवा अन्य माजी सनदी अधिकाऱ्याची निवड होणार असल्याची चर्चा आहे. साताऱ्यातील मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीला विकास देशमुख हजर होते.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले (वाशी), अरुण कडू-पाटील (उरण), ऍड. राम कांडगे (पुणे), महेंद्र लाड (पलूस), आजीव सेवक प्रतिनिधीपदी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी आ. अजितदादा पवार, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ऍड. भगीरथ शिंदे, ऍड. रवींद्र पवार, मीना जगधने, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकू कोंडा-पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादा कळमकर, प्रा. सदाशिव कदम, धनाजी बलभीम पाटील, लाइफ वर्कर प्रतिनिधीपदी नवनाथ जगदाळे, डॉ. संजय नगरकर, ज्योत्स्ना सुधीर ठाकूर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.