Raw Milk For Skin: आजच्या प्रदूषणयुक्त आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या वाढताना दिसत आहेत. धूळ, ऊन, असंतुलित आहार आणि ताणतणाव यांचा थेट परिणाम चेहऱ्यावर होतो. लहान वयातच सुरकुत्या, कोरडेपणा आणि निस्तेजपणा जाणवू लागतो. बाजारातील महागडे आणि रसायनयुक्त उत्पादने काही वेळा फायदेशीर ठरण्याऐवजी त्वचेला हानी पोहोचवतात. अशा वेळी घरच्या घरी उपलब्ध असलेले कच्चे दूध नैसर्गिक उपाय ठरू शकते. कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेची खोलवर स्वच्छता करतात. दिवसभर बाहेर राहिल्यानंतर चेहऱ्यावरील रोमछिद्रांमध्ये धूळ आणि घाण साचते. कच्चे दूध नैसर्गिक क्लींझरप्रमाणे काम करते. ते त्वचेवरील घाण आणि मृत पेशी अलगद काढून टाकते. दररोज फक्त एक चमचा कच्च्या दुधाने हलकी मालिश केली, तरी त्वचा ताजीतवानी वाटू लागते. कोरडी आणि निस्तेज त्वचेसाठी कच्चे दूध विशेष लाभदायक आहे. त्यातील जीवनसत्त्व बी आणि खनिजे त्वचेच्या पेशींना पोषण देतात. त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे चेहरा दिवसभर मऊ आणि हायड्रेटेड राहतो. नियमित वापर केल्यास डाग-धब्बे हळूहळू कमी होण्यास मदत होते. पुरळांवरही कच्च्या दुधाचा चांगला परिणाम दिसतो. त्यात जंतुनाशक गुणधर्म असतात. हे त्वचेवरील संसर्ग रोखण्यास मदत करतात. चेहऱ्यावर होणाऱ्या लहानसहान पुरळ आणि दाह कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो. कच्चे दूध त्वचेला थंडावा देते आणि सूज कमी करण्यास मदत करते. Raw Milk For Skin हा उपाय कसा करावा? उत्तम परिणामांसाठी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी अंघोळीपूर्वी १५ ते २० मिनिटे आधी कच्च्या दुधात थोडे गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. दूध वाळेपर्यंत तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय केल्यास फरक जाणवू लागतो. मात्र, अतिसंवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी आधी हाताच्या आतील भागावर छोटा पॅच टेस्ट करून पाहावी. काहींना दुधामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे त्वचेच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणेही योग्य ठरते. नैसर्गिक सौंदर्यासाठी महागड्या रसायनांच्या मागे धावण्यापेक्षा घरातील पारंपरिक उपाय सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकतात. कच्चे दूध हा त्यापैकीच एक सोपा आणि किफायतशीर उपाय आहे. नियमित आणि योग्य वापर केल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज आणि मृदुता येऊ शकते.