प्रभात वृत्तसेवा पुणे – जैन बोर्डिंग जमीन विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यास त्यातील २३० कोटी रुपयांंची रक्कम गोठवावी. याबरोबरच राज्य शासनाने सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमीन व्यवहाराची मंगळवारी (दि. २८) रोजी धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेण्याची तयारी दर्शविलेल्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता, त्या करारात असे नमूद आहे, की जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले, तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी २३० कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे. ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशा प्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी २३० कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी, असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.यापुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. काही न्यायमूर्ती, तसेच आयएएस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी, असे धंगेकर यांनी सांगितले आहे.