Satara: रवींद्र डांगे यांचे दिग्दर्शन आणि रंगवलेला आप्पा अप्रतिम
Satara

Satara: सातारा केंद्रावर ६५ व्या हौसी राज्य नाट्य स्पर्धेच्या शुभारंभादिवशी साताऱ्यातील थिएटर वर्कशॉप संस्थेच्यावतीने लेखक प्रताप गंगावणे लिखित आणि ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र डांगे दिग्दर्शित ‘सासूबाईंच असच असतं!’ या नाटकाने प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा निखळ आनंद दिला. नाटकाचा विषय हलका- फुलका असल्यामुळे सातत्याने प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते.
एक निवृत्त प्राध्यापक चिमाजी लक्षबुद्धे समंजस आणि जगाकडे डोळसपणे पाहणारे गृहस्थ. मुलाने शिस्तीत वागावे, नोकरी करावी आणि आयुष्याकडे गंभीरपणे पाहवे अशी त्यांच्या पत्नीची अपेक्षा. परंतु, मुलाच्या आयुष्यात प्रेम फुलू लागते. या प्रेमाकडे चिमाजीराव समजूतदारपणे पाहतात. कारण तारुण्यातील प्रेम भावना नैसर्गिक असते हे त्यांना माहीत असते. त्यामुळे ते मुलाच्या भावना समजून घेतात. लालूच्या आईला मात्र मुलाच्या वागण्यात बेफिकिरी आणि बेशिस्तपणा दिसतो. मुलाने प्रेमात पडण्यापेक्षा आपलं करिअर घडवावं असं तिला वाटतं. यातूनच घरात आई- वडील आणि मुलाच्या आयुष्यात संघर्ष उभा राहतो. याच संघर्षातून खरं नाटक सुरू होतं. एखाद्या घरात सासूबाईंचं असणं म्हणजे काय? तर त्यांचं प्रेम, काळजी, राग, हट्टाग्रह आणि हळवं मन हे लेखकान अगदी मार्मिक पणे दाखवल आहे. हे नाटक फक्त हसवत नाही तर हसवता- हसवता प्रेक्षकांना अंतर्मुख करते. प्रत्येक घरात ‘सासूबाईंचं असंच असतं!’ हाच या नाटकाचा गाभा आहे.
चिमाजीआप्पा यांचा मुलगा लालू (अभिमन्यू खांडेकर) त्यांच्या घरासमोरील निवृत्त मेजर सहस्त्रबुद्धे (विकास म्हस्के) यांच्या मुलीच्या (नयन- तन्वी शिंदे) प्रेमात असतो. त्यामुळे लग्नापूर्वीच्या प्रेमात मोहरुन जाणे, लग्नानंतरच्या संसाराची नवनवीन स्वप्ने पाहणे वगैरे गोष्टींचे स्वानुभव आप्पांना सांगत असतो. आप्पांची पत्नी कमल (संगीता चांगण) कडक शिस्तीच्या गृहिणी आणि लालूच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर होणार की नाही, हे त्यांच्या मर्जीवर अवलंबून असते. नयन लालूच्या घरी लहानपणापासून जात- येत असते. आईच्या कडक स्वभावानुसार तिची मर्जी संपादन करण्यासाठी नयनला देवाची पूजा- अर्चना, अनुष्ठान करण्याचे नाटक करण्यास लालू सांगतो. त्यामुळे आई खुश होते आणि त्यांच्या लग्नास परवानगी देते. कमलचा फटकळ स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे आप्पा घराबाहेर कितीही वाघ असले तरी घरात मांजरीसारखे बायकोच्या धाकात असतात. आप्पांचा जिगरी मित्र निवृत्त मेजर यांची पत्नी पूर्वीच नयन लहान असतानाच वारलेली असते. त्यांनी दुसरे लग्न न करता नयनला आई- बापाचे प्रेम देऊन वाढवलेले असते.लालू- नयनच्या लग्नानंतर अनुभवलेल्या सासुरवासानुसार कमल आपल्या सुनेला सासुरवास करण्यास सुरुवात करते.
नयन सरकारी ऑफिसात नोकरी करत असते. तिने ऑफिसनंतर लगेच घरी यावे, येताना भाजी घेऊन यावे, घरी स्वयंपाक वगैरे सर्व कामे करावी अशी कमलची अपेक्षा. त्यातून घरी वारंवार खटके उडू लागतात. त्यामध्ये लालूचे सँडविच व्हायला लागते. त्यातच नयन देवघरातील पूजेच्या चांदीच्या बांगड्या मैत्रिणीला भेट म्हणून देते. हे निमित्त होते आणि घरातली भांडणे विकोपाला जातात. नयन घर सोडून जाऊन लालूबरोबर वेगळा संसार थाटण्याचे ठरवते. लालूदेखील वैतागून घर सोडण्याचे ठरवतो. माणूस प्रेमात एकतर जीवापाड प्रेम करतो किंवा कचाकचा भांडतो असे अनुभवी आप्पा नयनला सांगतात. नयनला दिसणारे तिच्या सासूचे खाष्ट स्वरुप काळजीपोटी आणि तिच्या भल्यासाठी असल्याचे सांगतात. तिचे आणि लालूचे मन वळवतात. अखेर सर्व भांडणांचा शेवट गोड होतो. असा सुखान्त शेवट असणारे नाटक.
प्रताप गंगावणे यांचे हलके- फुलके अप्रतिम लेखन. रवींद्र डांगे या साताऱ्यातील ज्येष्ठ रंगकर्मीचे दिग्दर्शन आणि त्यांनी रंगवलेला आप्पा केवळ अप्रतिम! आपली हातखंडा असणारी विनोदी भूमिका आपल्या अप्रतिम टायमिंग सेन्समुळे त्यांनी अनेक वेळा प्रेक्षकांचे हसे आणि टाळ्या वसूल केल्या. नाटकातील गंभीर प्रसंग देखील त्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर आणले. खाष्ट सासू आणि कुटुंबावर प्रेम करणारी गृहिणी संगीता चांगण यांनी चांगली उभी केली. अभिमन्यू खांडेकर यांनी लालूची भूमिका उत्तम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. विकास म्हस्के यांचा मिल्ट्रीमॅन उत्तम. नवरंगकर्मी असणाऱ्या तन्वी शिंदे यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय. कुलदीप मोहिते आणि कैलास मोहिते यांनी नाटकाचे नेपथ्य चांगले केले आहे. वैशाली घोणे यांची रंगभूषा आणि साई घोणे यांची वेशभूषा पूरक. नाटकाचे ध्वनी संयोजन अभिषेक परदेशी आणि प्रकाश योजना सुनीता वर्मा यांनी उत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम नाट्यसंहिता, उत्तम दिग्दर्शन, पूरक तांत्रिक बाबी, कलाकारांचा उत्तम प्रयत्न यामुळे हलका- फुलका नाट्यप्रयोग प्रेक्षकांना हसत- हसवत अंतर्मुख करून गेला.





