छत्रपती संभाजीनगर : भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्याबाबत केलेले वक्तव्य राजकीय हेतूने नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. त्यांच्या विधानामुळे दिवंगत नेत्यांच्या मुलाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सोमवारी लातूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, तुमचा उत्साह पाहता विलासराव देशमुखांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे वक्तव्य केले होते. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र टीका झाली. या वादावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या कोण वेगाने सोडवेल, हे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वक्तव्यात विलासराव देशमुख यांच्यावर टीका केलेली नाही, मात्र काँग्रेस लातूरमध्ये त्यांच्या नावावर मते मागत असल्याचा आरोप त्यांनी केला. चव्हाण पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख हे मोठे नेते होते आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या विधानामुळे त्यांच्या मुलाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागतो आणि या वक्तव्याकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असे म्हणताना चव्हाणांनी सारवासराव केली. अमित, रितेश दोघेही आक्रमक विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते अमित देशमुख व अभिनेता रितेश देशमुख यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्या वडिलांच्या आठवणी अशा वक्तव्यांमुळे पुसल्या जाऊ शकत नाहीत, असे दोघांनीही स्पष्ट केले. याबरोबरीने काँग्रेसने चव्हाण यांच्या वक्तव्यावर टीका करताना हे विधान अहंकारातून आणि देशमुखांच्या वारशाबद्दल असलेल्या अज्ञानातून केले असल्याचा आरोप केला. विलासराव देशमुख यांनी लातूरच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात कायम असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.