Ravi Shastri strongly advice BCCI for Vaibhav Sooryavanshi :आयपीएल २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घालणारा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्गज गोलंदाजांची लय बिघडवणाऱ्या या युवा खेळाडूबाबत आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला एक मोठा आणि ऐतिहासिक सल्ला दिला आहे. “मला वयाशी काही फरक पडत नाही” – रवी शास्त्री ‘आयसीसी रिव्ह्यू’च्या ताज्या एपिसोडमध्ये संजना गणेशनशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “अनेक लोक विचारतील की तो १५ वर्षांचा आहे की १६ वर्षांचा? पण मला त्याच्या वयाशी काहीही फरक पडत नाही. मी फक्त त्याची सध्याची फलंदाजी पाहत आहे. तो आपल्यापेक्षा दुप्पट किंवा अडीच पट जास्त वय असलेल्या गोलंदाजांचा ज्या धैर्याने सामना करत आहे, ते अद्भूत आहे. जूनमध्ये भारताचा आयर्लंड दौरा (दोन टी-२० सामने) आहे, मला वैभवला त्या दौऱ्यात भारतीय संघात पाहायला आवडेल.” जर एखाद्या तरुणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणायचे असेल, तर टी-२० हा सर्वोत्तम फॉरमॅट असल्याचेही शास्त्री यांनी नमूद केले. जर असे झाले, तर वैभव भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण (International Debut) करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत निघेल. Ravi Shastri has backed Vaibhav Sooryavanshi to make his debut for India sooner rather than later, given his impressive performances during the ongoing IPL season.#TeamIndia pic.twitter.com/g3k3x68noA — Circle of Cricket (@circleofcricket) May 17, 2026 आयपीएल आणि अंडर-१९ मध्ये धावांचा पाऊस – वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी ११ सामन्यांत ४० च्या सरासरीने आणि तब्बल २३६.५६ च्या तुफानी स्ट्राईक रेटने ४४० धावा कुटल्या आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूंत ठोकलेल्या १०३ धावांच्या झंझावाती शतकाचा समावेश आहे. चालू हंगामात त्याने आतापर्यंत सर्वाधिक ४० षटकार ठोकले आहेत. याआधी त्याने अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरारे येथे इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची महाभयंकर खेळी केली होती. तसेच तो बिहारकडून खेळताना लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. हेही वाचा – Satwik Chirag Withdraws : थायलंडमध्ये रौप्य पदक जिंकताच सात्विक-चिरागचा मोठा निर्णय! ‘या’ प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून अचानक घेतली माघार टीम इंडियाच्या आगामी दौऱ्यांचे वेळापत्रक – वैभव सूर्यवंशीची नुकतीच ९ ते २१ जून दरम्यान होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी ‘इंडिया ए’ संघात निवड झाली आहे, जिथे श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळवले जातील. त्यानंतर २६ जूनपासून भारताचा सीनियर संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे, तर १ जुलैपासून इंग्लंडमध्ये ५ टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. आता रवी शास्त्रींच्या या सल्ल्यानंतर बीसीसीआय वैभवला थेट सीनियर संघात लाँत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.