Ravi Pujari Arrest : कुख्यात गुंड रवी पुजारीला ठाणे पोलिसांकडून अटक
कुख्यात गुंड रवी पुजारी (Ravi Pujari Arrest) याला २०१७ मधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि त्याच्या कार्यालयावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी अखेर अटक केली.

Ravi Pujari Arrest : कुख्यात गुंड रवी पुजारी (Ravi Pujari Arrest) याला २०१७ मधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि त्याच्या कार्यालयावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी अखेर अटक केली. पुजारीला बुधवारी ठाण्यातील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२०१७ साली पुजारीने (Ravi Pujari Arrest) ठाण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले होते. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी त्याने आपल्या हस्तकांमार्फत संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबारही घडवून आणला होता.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५, ३८७ आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नंतर या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Ravi Pujari Arrest) या कारवाईसाठी बेंगळुरू येथील परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून पुजारीचा ताबा मिळवला आणि मंगळवारी त्याला ठाण्यात आणले. मूळचा कर्नाटक राज्यातील उडुपी येथील असलेला पुजारी अनेक वर्षे परदेशातून आपली गुन्हेगारी टोळी चालवत होता. २०२० मध्ये त्याला सेनेगलमधून भारतात प्रत्यार्पण करून आणण्यात आले होते, तेव्हापासून तो विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात आहे.






