Raveena Tandon: रवीना टंडन पुण्यात गणेशदर्शनाला; पंजाब-हिमाचल पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी केली प्रार्थना

Raveena Tandon: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन गुरुवारी पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सव पंडालात दर्शनासाठी आल्या. १३४ वर्ष जुना हा पंडाल पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल त्या धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले. बाप्पाची आरती केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रवीनाने देशातील सर्व जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि सलामतीसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या, “मी माझ्या देशासाठी, देशातील लोकांसाठी आणि प्राणी-मात्रांसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रात आपण मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो. या पंडालात येऊन मी बरेच काही शिकले. आपल्या शाळांमध्ये इतिहास फारसा शिकवला जात नाही, पण इथे येऊन मला आपली परंपरा आणि संस्कृती जवळून अनुभवायला मिळाली.”
यावेळी रवीना टंडन यांनी पंजाब आणि हिमालयीन राज्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रार्थना केल्याचेही सांगितले. त्यांनी पंजाबमधील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत तेथील लोकांसाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागितला.
सध्या पंजाब व हिमाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमधील सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक खेडी पाण्याखाली गेली आहेत. परिस्थिती बिकट होत असल्याने पंजाब सरकारने राज्याला आपत्तिग्रस्त घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर रवीनाची ही प्रार्थना जनतेसाठी दिलासा ठरली आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात सहभागी होत असतानाच रवीनाने देशभरातील लोकांच्या सुरक्षिततेची कामना केली, ही बाब उपस्थित भाविकांना भावली.




