Pune rave party : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी; बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात, गुन्हे शाखेची धडक कारवाई

Pune rave party : पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा मारत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे. ही पार्टी खराडातील एका फ्लॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या छाप्यात पोलिसांनी २ महिलांसह ५ पुरुषांना ताब्यात घेतले होते. शनिवारी गुप्त पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून धडक कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याच्या पतीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाई रेव्ह पार्टीतील तीन पळून गेलेल्या महिलांचा शोध पोलीस घेत आहेत.
रेव्ह पार्टी प्रकरणी पाच जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू असून, यापूर्वी शहरातील अनेक अवैध दारू अड्ड्यांवर छापेमारी करत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचे आयोजन कुणी केलं होतं, अंमली पदार्थांचा पुरवठा कसा करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हाऊस अॅाफ पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समाेर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या रेव्ह पार्टीमुळे पुण्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच रेव्ह पार्टीच्या घटनेमुळे खराडी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





