संजय राठोड यांच्या पोहरादेवी शक्ती प्रदर्शनावर राऊतांचं मोठं व्यक्तव्य म्हणाले,…

मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आरोपांवर संजय राठोड हे चक्क १५ दिवसांनी सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या शक्तीप्रदर्शनावरून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले होते.





