कामशेत : मावळ तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये ई-पॉश मशीनच्या सततच्या अडचणीमुळे रेशनिंग दुकानदार आणि कार्डधारक त्रस्त झाले आहेत. राज्यभरातील रेशन दुकानांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून ई-पॉस सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप ठप्प झाले आहे. सर्व वाटप प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे सर्व्हर डाऊन असताना ऑफलाईन वाटप करता येत नाही. त्यामुळे कार्डधारकांना वारंवार दुकानांचे फेरे मारावे लागत असून, दुकानदार व कार्डधारक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. पावसाळ्यात नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. ई-पॉश मशीनमधूनच धान्य वाटप करण्याचे नियोजन असून, यंत्रणा सुरळीत नसल्यानं रेशन वाटप बंद आहे. याशिवाय ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत असून, सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते कामही पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीकडून कोणताही प्रतिनिधी नेमलेला नाही. त्यामुळे समस्या अधिकच वाढल्या आहेत. शासनाने तातडीने सर्व्हर सुरळीत करावा किंवा ऑफलाईन वाटपाला परवानगी द्यावी तसेच ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवावी. – अंकुश आंबेकर, दुकानदार संघटना