पुणे जिल्हा | स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांनी बहिरवाडीत रेशनदुकान

परिंचे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील सर्वात दुर्गम व आदिवासी बहिरवाडी या गावाला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच रेशनिंग दुकान मिळाले आहे. माजी सरपंच दशरथ जानकर यांच्या हस्ते उद्घाटन करून गावात स्वस्त धान्य वितरण करण्यास सुरुवात करण्यात आले आहे.
स्त्री शक्ती महिला समुहाच्या माध्यमातून वितरण व्यवस्था करण्यात आली असल्याचे महिला गटाच्या अध्यक्षा शैला जानकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या पुजा चिव्हे, संगीता भगत, ग्राम संघाच्या अध्यक्षा मनीषा भगत, सुप्रिया कोकरे, अंगणवाडी सेविका अलका वाशीलकर, आशा सेविका सुनिता ढगारे, बनुबाई ढगारे, रेश्मा ढगारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दुर्गम भागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करत प्रशासनाने या बचत गटास स्वस्त धान्य दुकानाचा परवाना दिला असून स्री शक्ती महिला बचत गटांने तातडीने गहू, तांदूळ व अंत्योदय साखर वितरण व्यवस्था सुरू केली आहे.
या दुकानाची वितरण व्यवस्था व्यवस्थित व विश्वसनिय पद्धतीने पार पाडावी यासाठी महिला बचत गटाच्यावतीने याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
गावपातळीवर रेशनिंगची सुविधा सुरू झाल्यामुळे आदिवासी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. 100 टक्के रेशनिंग वाटप करून या उपक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
दुकानाचे योग्य नियोजन व्हावे यासाठी मंगल जानकर, वैशाली भगत, अनिता कोकरे, हिराबाई कोकरे, यमुना भगत,बायडाबाई जानकर आदी सभासद महिला प्रयत्न करीत आहेत.
बचत गटाला रेशनिंग परवाना मिळाल्याने गावातील नागरिकांची पायपीट थांबली असून त्यांना आपल्या स्वतःच्या गावात रेशनिंग मिळत आहे.
सध्या आमच्याकडे 160 ग्राहकांची वितरण व्यवस्था असुन लवकरच संपूर्ण गावाला आपल्या गावातच धान्याचा लाभ देऊ शकू एवढे सक्षम आम्ही बनू. -शैला जानकर, अध्यक्षा, बचत गट

