‘शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला…,’; बच्चू कडू पुन्हा आक्रमक

Bacchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी, तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असे थेट म्हटले. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये ते बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असताना गप्प आहेत. जाती-पातीच्या राजकारणात शेतकरी अडकून पडले आहेत. ते अन्यायाच्या विरोधात पेटून उठत नाहीत. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. आपण जर शेतकऱ्याला विचारले तर तू काय करतो, तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मारण्यापेक्षा लढणे सुरू करा.”
“आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादा परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खे गाव सुखी होऊ शकेल, सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही,” असेही त्यांनी थेट सरकारवर जोरदार टीका केली.
सर्व जाती याच मातीमुळे जगतात
बच्चू कडू म्हणाले, लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला, सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असते हप्ते वसूल केले की झाले,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली. Bacchu Kadu |
सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा रंगात वाटले
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीने लढाई केली. शरद जोशी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा रंगात वाटले आणि त्यामुळे शेतकरी वाटला गेला,” असेही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी सरकारविरोधात संघर्षासाठी येत्या २८ ऑक्टोबरला नागपूर येथे एकत्र येण्याचे आवाहन केले. परंतु त्याआधी आमदारांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. Bacchu Kadu |
हेही वाचा :
“INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली होती” ; मोदींनी समुद्रात नौदलासोबत केली दिवाळी साजरी





