बेडवर मरण्यापेक्षा पाटावर मरण पत्करील

माजी मंत्री मधुकरराव पिचड ः बंदिस्त कालव्यांसाठी इंदोरीफाटा येथे केले आंदोलन

उद्धटपणाची भाषा खपवून घेणार नाही

अकोले तालुक्‍यात अनेक कामे प्रलंबित आहेत. ती कामे पूर्ण करायची नाहीत आणि अकोले तालुका उद्‌ध्वस्त करण्यास लाभक्षेत्रातील पुढारी निघाले आहेत. प्रलंबित कालव्यांची कामे सुरू करण्याची हमी द्या. हमी द्यायची नाही. बापाचे पाणी आहे काय? अशी उद्धटपणाची भाषा करायची हे आपण चालू देणार नाही, असा इशारा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना व सरकारला दिला.

अकोले – “घरी बेडवर मरण्यापेक्षा पाटावर मरण पत्करील, माझा बाप काढणाऱ्यांना, त्यांच्याकडे पाठवण्यात येईल,’ असा खणखणीत इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला. तसेच अकोले तालुक्‍यातील प्रलंबित असणारे प्रश्न चर्चा करून सोडविले जात नाही. तोपर्यंत अकोले तालुक्‍यातील कालव्यांची कामे सुरू होऊ देणार नाही, असा इशारा आ. वैभवराव पिचड यांनी दिला.

आज इंदोरी फाटा येथे निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त व्हावेत, जांभळे, काळेवाडी, बदगी खिळपाट पाझर तलावाचे काम सुरू केले जावीत, तालुक्‍यातील रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, चिल्लेवाडी धरणातून ब्राम्हणवाडा, जांभळे, काळेवाडी, बदगी, कळंब, मन्याळे, पिसेवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात यावे, या व अन्य मागण्यांसाठी आज तब्बल तीन तास “रास्तारोको’ आंदोलन केले. त्यावेळी पिचड पिता-पुत्रांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला.

अकोल्याच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा होत नाही, तो पर्यंत कालव्यांची कामे सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देऊन आ. वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आमचे पाणी पळविण्याचा खालील आमदार व खासदारांचा डाव सुरू आहे. तो त्यांचा डाव मी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. जोपर्यंत अकोले तालुक्‍यातील प्रलंबित असणारे प्रश्न चर्चा करून सोडविले जात नाहीत, तोपर्यंत अकोले तालुक्‍यातील कालव्यांची कामे सुरू होऊ देणार नाही, असे त्यांनी वारंवार सूचित केले.

माजी मंत्री पिचड यांनी राजकारणासाठी राजकारण आम्ही करीत नाही. आणि तसे कोणाला करु देणार नाही असा इशारा देत आमचा कामे करण्यास विरोध नाही. मात्र आमच्या तालुक्‍याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावावी. आणि तिथे चर्चा केल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत अकोले तालुक्‍यात कालव्याच्या कामासाठी पाय ठेवू देणार नसल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

अकोले तालुक्‍यातून जाणारे निळवंडेचे सर्व कालवे तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत ओपन न नेता बंद पाईपलाईनद्वारेच भूमिगत करावेत, या प्रमुख मागणीसाठी कालवेग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व आ वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली इंदोरी फाटा येथे कोल्हार-घोटी राज्यमार्ग अडवत सुमारे तीन तास तळपत्या उन्हात रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष मधुकरराव नवले, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंतराव आभाळे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आशाताई पापळ, ज्येष्ठ शेतकरी नेते अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद देशमुख, भाकपचे वकील शांताराम वाळुंज, अगस्तीचे संचालक सुरेशराव गडाख, माकपचे खंडू वाकचौरे, दूध संघाचे संचालक गोरक्षनाथ मालुंजकर, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, शंभू नेहे, राहुल देशमुख, सागर वाकचौरे आदीची यावेळी भाषणे झाली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकुंद कांबळे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, कालवा विभागाचे अभियंता शिंगाडे यांना देण्यात आले. रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर कोल्हार घोटी राज्यमार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.