Actress Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ च्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘छावा’ चित्रपटामध्ये ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामुळे रश्मिका देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना अभिनेत्री इंडस्ट्रीतून निवृत्ती घेण्याबद्दल वक्तव्य केले. ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात बोलताना रश्मिकाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर आता निवृत्त होण्यास देखील तयार असल्याचे वक्तव्य केले. तिने निवृत्तीचे विधान मस्करीत केले असले तरीही तिच्या या वक्तव्याने चाहते देखील आश्चर्यचकित झाले. ट्रेलर लाँचवेळी बोलताना रश्मिका म्हणाली की, ‘ही एक सन्मानाची गोष्ट आहे. दक्षिणेतून आलेल्या एका मुलीला महाराणी येसूबाईंची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात विशेष बाब आहे. लक्ष्मण सरांना सांगते की, यानंतर मी आता आनंदाने निवृत्ती घेण्यासही तयार आहे. मी रडणारी व्यक्ती नाही. पण हा ट्रेलर पाहून भावूक झाले.’ महाराणी येसूबाईंच्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘लक्ष्मण सरांनी मला अशाप्रकारची भूमिका साकारण्यास सांगितले तेव्हा मी चकित झाले. यासाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.’ दरम्यान, अभिनेता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूपच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका साकारत आहे. याशिवाय, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, नील भूपालम, संतोष जुवेकर आणि प्रदीप रावत हे कलाकार देखील चित्रपटात आहे. 14 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.