Phaltan: दुर्मीळ अमूल फाल्कन फलटणमध्ये दाखल
Phaltan फलटण तालुक्यात अमूर फाल्कनची झालेली ही पहिली नोंद स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. या दुर्मिळ स्थलांतरित पाहुण्याच्या नोंदीचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण व्हावे, त्याच्या अधिवासाचे संरक्षण व्हावे आणि वनविभागासह स्थानिक पक्षीप्रेमींनी या दिशेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Phaltan: सैबेरिया आणि उत्तर चीनमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करणार्या दुर्मीळ अमूर फाल्कन (ऋरश्रले र्राीीशपीळी) या शिकारी पक्ष्याची फलटण तालुक्यात प्रथमच नोंद झाली आहे. तब्बल 22 हजार किलोमीटरपर्यंत स्थलांतराचा प्रवास करणार्या या वैशिष्टयपूर्ण पक्ष्याचे फलटण परिसरात दर्शन घडल्याने पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नोंदीमुळे सातारा जिल्ह्यातील पक्षी निरीक्षणाच्या इतिहासात एका महत्त्वपूर्ण घटनेची भर पडली आहे.
गणेश धुमाळ आणि रवींद्र लिपारे या पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांनी फलटण परिसरात या पक्ष्याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्रण केले. नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे सदस्य असलेल्या या निरीक्षकांना सुरुवातीला हा पक्षी सामान्य शिकारी बाज असल्याचे वाटले. मात्र, त्याचा विशिष्ट रंग, शरीररचना आणि उडण्याची पद्धत यांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तो दुर्मिळ अमूर फाल्कन असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अमूर फाल्कन हा आकाराने लहान असला, तरी त्याच्या असामान्य स्थलांतर क्षमतेमुळे जगभरातील पक्षी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतो. साधारणतः 27 ते 30 सेंटीमीटर लांबी आणि 120 ते 150 ग्रॅम वजन असलेला हा पक्षी सैबेरिया व उत्तर चीनमध्ये प्रजनन करतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान तो हिवाळी अधिवासासाठी भारतामार्गे दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. या पक्ष्याच्या नराचे शरीर गडद राखाडी ते काळसर रंगाचे असते. आकाशात वेगाने झेपावत कीटकांची शिकार करण्याची त्याची पद्धत विशेष लक्षवेधी असते. समुद्रावर विश्रांतीसाठी थांबण्याची संधी नसताना हा पक्षी अनुकूल वार्यांचा उपयोग करून सलग अनेक दिवस उड्डाण करू शकतो. त्याच्या स्थलांतराचा एकूण प्रवास सुमारे 22 हजार किलोमीटरपर्यंत पोहोचतो.
अमूर फाल्कन हा प्रामुख्याने वाळवी, टोळ, भुंगे आणि इतर उडणार्या कीटकांवर उपजीविका करतो. भारतात या पक्ष्याचे मोठ्या प्रमाणावर दर्शन प्रामुख्याने ईशान्येकडील नागालँड, मणिपूर आणि आसाम या राज्यांत घडते. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील फलटण तालुक्यात या पक्ष्याची झालेली प्रथम नोंद विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
फलटणसारख्या दुष्काळी पट्ट्यात या पक्ष्याचे दर्शन घडण्यामागे स्थलांतरादरम्यानचा मार्ग बदल, हवामानातील बदल किंवा मुख्य थव्यापासून भरकटलेला पक्षी अशी विविध कारणे असू शकतात. मात्र, या निरीक्षणामागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी अधिक अभ्यास आणि सातत्यपूर्ण निरीक्षण आवश्यक आहे. अमूर फाल्कनचा जागतिक स्तरावर आययूसीएनच्या लाल यादीत ’लीस्ट कन्सर्न’ अर्थात सध्या कमी चिंतेची प्रजाती असा दर्जा आहे.
फलटण तालुक्यात अमूर फाल्कनची झालेली ही पहिली नोंद स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. या दुर्मिळ स्थलांतरित पाहुण्याच्या नोंदीचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण व्हावे, त्याच्या अधिवासाचे संरक्षण व्हावे आणि वनविभागासह स्थानिक पक्षीप्रेमींनी या दिशेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





