Rapper Emiway Bantai : रॅपर एमीवे बंटाईला धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक

नवी मुंबई : ‘रिंग रिंग’, ‘जमैका टू इंडिया’ आणि आपल्या अतरंगी रॅप गाण्यांनी प्रसिद्धी मिळवणारा प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई उर्फ मुहम्मद बिलाल शेखला धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने १ कोटी खंडणीची मागणी केली होती. याबाबत रॅपर एमीवे बंटाईने तक्रार केली होती. नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत धमकी देणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला आसाममधून अटक केली आहे. आरोपीचे नाव अरुलव रमेश कुमार अलोही असे आहे.
नवी मुंबई पोलीसांनी धमकी देणाऱ्या १८ वर्षांच्या अरुलव रमेश कुमार अलोहीला अटक केली आहे. तो वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. अलोही याच्यावर रॅपर एमीवे बंटाईच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर फोन करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे, नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आसाममधून आरोपीला अटक केली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अरुलव अलोही याने गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंध असल्याचा खोटा बहाणा करून हे कृत्य केले होते. दरम्यान, रॅपर एमीवे बंटाई याने दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘ट्रिब्युट टू सिद्धू मूसेवाला’ हे गाणे रिलीज केले होते. गाणे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॅपरला धमकी देण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीला सोशल मीडियावर कोणीतरी धमकीचे संदेश पाठवण्यास प्रेरित केले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीच्या मोबाईलवरून हे संदेश डिलीट करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड दुसराच असल्याचा संशय पोलिसांना आहे.





