पहिल्या 15 चाचण्यांमध्ये 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह पुणे – करोनाची साथ रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात तब्बल 1 लाख रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. या टेस्टला आज प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात सुरुवात करण्यात आली असून पहिल्या दिवशी 15 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात, 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, या टेस्टची वैधता महापालिकेकडूनही तपासण्यात येणार असून या 15 जणांची एनआयव्हीकडेही तपासणी केली जाणार आहे. त्यांचे चाचणीचे नमुनेही संकलित करण्यात आले आहेत. त्यामुळे एनआयव्हीच्या अहवालानंतरच या चाचण्यांची वैधता महापालिकेकडून निश्चित केली जाणार आहे. शहरातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढविण्याचा तसेच त्या अंतर्गत शहरातील 1 लाख नागरिकांच्या रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे साडेचार कोटींच्या किटची खरेदी पालिकेने केली आहे. या किटच्या वापराला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ. नायडू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी आली. यावेळी ज्या 15 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार होती. त्यांचे एनआयव्हीसाठीच्या चाचणीचे अहवालही घेण्यात आले. त्यानंतर रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात 15 मध्ये 5 जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यात, तिसरी, सातवी, नववी तसेच अकरावी आणि पंधराव्या व्यक्तीची चाचणी करोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर या पाचही जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून आता एनआयव्हीच्या अहवालानंतरच या टेस्ट किटची वैधता समोर येणार आहे. त्याबाबत उत्सुकता आहे.