लोणी काळभोर -विवाहित महिलेला महाविद्यालयातील प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बळजबरीने शारिरीक संबंध ठेवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. इक्बाल मोमीन (रा. खडकवासला, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या लग्नापूर्वी 2017 ते 2018 या कालावधीत ती पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी तिचे व इक्बाल मोमीन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये इक्बालचे लग्न झाल्यामुळे प्रेमसंबंध तुटले होते. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर पीडितेचे फेब्रुवारीमध्ये लग्न झाले. तिचा संसार व्यवस्थित सुरू होता. दि.5 मार्चला इक्बाल याने तिला जुने प्रेमसंबंधाचे फोटो पाठविले. तिने स्वत:हून त्याच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. त्यावेळी इक्बालने तिला ब्लॅकमेल करून भेटण्याची गळ घातली. दोघांचे फोटो तिच्या व्हॉटस्ऍपवर आल्याने ती घाबरली होती. इक्बालला लग्न झाल्याचे सांगण्यासाठी तिने दि. 21 मार्च रोजी खडकवासला धरण चौपाटी येथे भेटली. त्यावेळी इक्बाल हा तिला म्हणाला की ‘मी माझे बायकोला घटस्फोट दिला असून तू माझ्यासोबत लग्न कर. तिने त्यास माझे लग्न झाल्याचे सांगून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ती घरी आली होती. तो मोबाईलवर संपर्क करून तिला दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याशी बोलण्यास भाग पाडीत होता. दि. 9 मे रोजी दुपारी तिला भेटण्याकरिता तो दुचाकीवरून आला . जुन्या प्रेमसंबंधाबाबत कोणास काही कळू नये म्हणून ती त्याला भेटली. त्याने तिला नऱ्हे- आंबेगाव येथील रानजाई बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटवर नेले. त्याने तिला लग्नाविषयी पुन्हा गळ घातली. दि. 10 मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास त्याने तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. ती घाबरल्याने तिला त्याने दुपारी कात्रज चौक येथे आणून सोडले. ती घरी आल्यानंतर आई-वडिलांना याची माहिती दिली. इक्बाल याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून 1 मुलगी आहे, अशी माहिती समोर आली आहे. पीडित विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील पोलीस सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.