मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या विस्तारात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रीमंडळातून अनेक नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. अनेक नेत्यांनी आपली नाराजी बोलूनदेखील दाखवली आहे. दरम्यान, या घडामोडींवर आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. काय म्हणाले रावसाहेब दानवे? सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले कि, “सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आता कदाचित पक्षाने त्यांचा वेगळा विचार केला असेल. त्यांच्यावर वेगळी मोठी जबाबदारी पक्ष देणार असेल, त्यासाठी कदाचित त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नसेल. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचा अर्थ त्यांचं पक्षातील स्थान कमी होईल असं नाही. ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तसेच ते नाराज असतील असं मला वाटत नाही”, असे दानवे म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “ते कवी आहेत. अशा विषयांवर नाही तर त्यांनी अनेकवेळा कविता केलेल्या आहेत. आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? कशामुळे मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही? हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही”, असे रावसाहेब दानवे म्हणाले.