Raosaheb Danve| लोकसभा निवडणुकी निकालात भाजपला चांगलाचा फटका बसला आहे. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. राज्यात भाजपाला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे म्हणाले की, “कोणत्या एका व्यक्तीमुळे आमचा परभव झाला नाही. राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. माझ्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघात मला कमी मताधिक्य मिळालं. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही.” “विधानसभा निवडणुकीत बाजी मारू” पुढे ते म्हणाले, “लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला. १३ तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र अपयश आलं. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू,” असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी ‘रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन’, असा शब्द दिला होता. त्यावरही दानवे यांनीभाष्य केले आहे. अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असेही दानवे म्हणाले. डॉ.कल्याण काळे विजयी दरम्यान, जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे निवडणुकीत मैदानात होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. हेही वाचा: “चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन