नारायणगाव (वार्ताहर) – यू ट्युब चॅनलवर बदनामी करण्याच्या उद्देशाने बातमीच्या आशयाखाली चुकीची माहिती समाज माध्यमांमध्ये पसरवून खंडणी मागणाऱ्या दोघांना नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली असून त्यास जुन्नर न्यायालयात शुक्रवारी (दि. 24) हजर करणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
यू ट्यूब चॅनलचे संदीप पांडुरंग उतरडे (वय 30 रा. आपटाळे, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे तर सचिन जाधव (वय 32) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सचिन कृष्णाचंद ठाकूर (वय 28, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, एका जमिनीच्या कायदेशीर मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरू होती. मात्र, दोन्ही आरोपींनी सत्यता न पडताळता ठाकूर यांनी जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची बेकायदेशीर मदत घेतली आहे व त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रसारित केले. यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची बदनामी केली. तसेच यापुढे बातम्या लावणार नाही असे म्हणून ठाकूर यांच्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली. यातील 25 हजार रुपये ठाकूर यांच्याकडून घेतले आहे, असे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.