जिगरबाज खेळामुळेच ‘रणजी करंडक’ जिंकलो : जयदेव उनाडकट

राजकोट – कोणत्याही परिस्थितीत अंतिम फेरीचा सामना हातून निसटून द्यायचा नाही, इतक्या वर्षांनंतर प्रथमच आपण अंतिम फेरीत पोहोचलो आहोत, तर चषक घेऊनच यायचे, असा दृढ निश्चय करत, जिगरबाज खेळ केल्यानेच आम्हाला यावर्षी प्रथमच रणजी करंडकावर आमचे नाव कोरता आले, अशी प्रतिक्रिया रणजी-विजेत्या सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट याने दिली आहे.
मागील वर्षी विदर्भाकडून अंतिम फेरीत झालेल्या पराभवामुळे आम्ही यावर्षी अधिक सावध होतो, असे सांगून उनाडकट म्हणाला की, किमान अंतिम फेरीत पोहोचून आपण चषक जिंकण्यापर्यंत मजल मारू शकतो, हा आत्मविश्वास गतवेळच्या उपविजेतेपदाने दिला.
मध्यमगती गोलंदाज असलेल्या जयदेवने गेल्या वर्षीच्या स्पर्धेत 17.17 धावांच्या सरासरीने 39 विकेट्स घेत लक्षणीय कामगिरी केली होती. यावर्षी आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत त्याने 13.23 धावांच्या सरासरीने एकूण 67 विकेट्स घेतल्या. त्याच्या या आक्रमक गोलंदाजीमुळेच सामने आपल्या बाजूने झुकवण्यात सौराष्ट्रला यश आल्याचे मानले जात आहे.इतकेच नव्हे, तर शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांच्या अनुष्टुभ मजुमदार आणि अर्णव नंदीच्या 98 धावांच्या भागीदारीने सौराष्ट्रला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी मिळाली, हेही उल्लेखनीयच ठरले.
सामन्याच्या पाचव्या दिवशी बंगालच्या संघाला बरोबरी साधण्यासाठी अवघ्या 72 धावांची गरज होती आणि त्यांचे कसलेले फलंदाज खेळपट्टीवर नाबाद होते. त्यावेळी मैदानात उतरताना आणि प्रत्येक चेंडू फेकताना मी इतकाच विचार करत होतो की, हा माझा या हंगामातला सर्वोत्तम चेंडू ठरेल, ज्याने संपूर्ण सामना आमच्या बाजूने वळेल आणि मग तो चमत्कार झाला, असे उनाडकट म्हणाला.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये सौराष्ट्रच्या खेळाडूंनी कर्णधार उनाडकटसह अनेक विक्रमही केले. मात्र, याविषयी बोलताना उनाडकट म्हणाला की, तुम्ही खेळत राहता आणि विक्रम होत राहतात, या दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मात्र, त्याचवेळी तो असेही सांगतो की, व्यक्तिगत विक्रमासाठी न खेळता संघाच्या हितासाठी खेळा. मी आजवर हे तत्त्वच शिरसावंद्य मानले आहे. आम्ही जर अंतिम फेरीत जिंकू शकलो नसतो, तर मला माझ्या एकाही विक्रमाचा आनंद घेता आला नसता; ती माझी मनोवृत्तीही नाही.
संघाच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत आपली जबाबदारी ओळखून खेळ केला, त्याबद्दलही उनाडकटने कृतज्ञता व्यक्त केली. अर्पिता वासवदाने उपान्त्य आणि अंतिम सामन्यातही शतक झळकावले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याला हातभार लागला. अष्टपैलू चिराग जानी, सलामीवीर हार्विक देसाई तसेच अनुभवी क्रिकेटर शेल्डन जॅक्सनच्या सिझनमधल्या 800 धावाही मोलाच्याच ठरल्या.
संघाचा प्रमुख आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा राष्ट्रीय संघात खेळायला परदेशी गेल्याने संघात उणीव निर्माण झाली होती. मात्र, धर्मेंद्र जडेजाने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवत 32 विकेट्स घेत लक्षवेधी कामगिरी केली. मागील हंगामातही त्याने 59 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय उशिराने संघात परतलेल्या चेतेश्वर पुजाराने 63.88 च्या सरासरीने 575 धावा करत आपला दर्जा सिद्ध केला. त्याने वासवदासमवेत केलेल्या भागीदारीने सौराष्ट्राच्या अंतिम फेरीतील विजयाचा पाया रचला गेला, हे नक्की.
आपल्या कामगिरीबाबत पुजारा म्हणाला की, मला नेहमी दर्जेदार आणि आक्रमक खेळून, चांगल्या व जबाबदार फलंदाजीचे एक उदाहरण घालून द्यावेसे वाटते. मात्र, या संघात मी बराच खालच्या क्रमांकावर खेळत होतो. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मी फलंदाजीला मैदानावर उतरलो, त्यावेळी परिस्थिती कठीण होती. मात्र, 350 पेक्षा जास्त धावा केल्यास सामना आपल्या हातात राहील, असा निश्चय करूनच मी संयमी आणि जबाबदारीने फलंदाजी केली, ज्याचे चांगले फळ संघाला मिळाले.





