रणजी करंडक क्रिकेट : मुंबईचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित

बेंगळुरू – पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 53 चेंडू घेतलेल्या यशस्वी जयस्वालने नंतर मात्र तडाखेबंद 181 धावांची खेळी केली. अरमान जाफरनेही शतक फटकावले. जयस्वालचे द्विशतक जरी हुकले असले तरीही त्याने जाफरच्या साथीत मुंबईला साडेसहाशेपेक्षाही जास्त धावांची आघाडी मिळवून दिली.
शुक्रवारी चौथ्या दिवशी मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात खेळ थांबला तेव्हा 4 बाद 449 धावा केल्या असून आता त्यांच्याकडे तब्बल 662 धावांची आघाडी आहे. शनिवारी सामन्याचा पाचवा व अखेरचा दिवस असून पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांचा यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेशही निश्चित मानला जात आहे.
– जयस्वालचे द्विशतक हुकले
– अरमान जाफरचे शतक
– मुंबई दुसऱ्या डावात 4 बाद 449
– एकूण आघाडी तब्बल 662 धावांची
मुंबईने पहिल्या डावात 393 धावा करताना उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर संपवला व मोठी आघाडी घेतली. त्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 4 गडी गमावून 449 धावा करत एकूण आघाडी 662 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी अद्याप दुसरा डाव घोषित केला नसून कदाचित पाचव्या दिवशीही ते फलंदाजी करणेच पसंत करतील. याच डावपेचाच्या जोरावर मुंबई पहिल्या डावातील आघाडीमुळे अंतिम फेरीत स्थान मिळवेल.
शुक्रवारी 1 बाद 133 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर जयस्वाल व जाफर यांनी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला त्रिशतकी धावांची मजल मारून देताना अडीचशे धावांची भागीदारी केली. त्यानंतर दोघांनीही आपापली शतकेही साकार केली. जयस्वाल जास्त वेगाने फलंदाजी करत होता. त्याला सुरेख साथ देत जाफरनेही आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने संघाच्या चारशे धावाही फलकावर लावल्या.
जयस्वाल द्विशतकाकडे कूच करत असतानाच 372 चेंडूंचा सामना करत 23 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 181 धावावर बाद झाला. जाफरने आपल्या 127 धावांच्या खेळीत 259 चेंडूत 15 चौकार व 2 षटकार फटकावले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराज खान 23 तर शम्स मुलाणी 10 धावांवर खेळत आहेत. उत्तर प्रदेशकडून प्रिन्स यादवने 2 गडी बाद केले.
मध्य प्रदेश विजयाच्या उंबरठ्यावर
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेश बंगालविरुद्ध विजयाच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 341 धावा केल्या व बंगालचा पहिला डाव 273 धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात त्यांनी 281 धावा केल्या व बंगालसमोर निर्णायक विजयासाठी 350 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बंगालने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 96 धावा केल्या असून त्यांना अद्याप 254 धावांची गरज आहे. या सामन्यावर पहिल्या दिवसापासूनच मध्य प्रदेशने वर्चस्व राखले असून त्यांनाही अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे.





