श्रीनगर : जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सोनेरी अक्षरात नाव कोरले. १९३४ पासून सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या ९६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरने दिल्लीला पराभूत केले. दिल्लीच्या होमग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जम्मू-काश्मीरने दिल्लीला ७ विकेटने नमवले. प्लेयर ऑफ द मॅच आकिब नबी ठरला, तर कर्णधार परास डोगरा, कामरान इकबाल आणि ‘शर्माजींचा मुलगा’ वंशज शर्मा यांनी कमाल केली. पहिला डाव दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २११ धावा केल्या. जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीने ३५ धावांत ५ विकेट घेत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने कर्णधार परास डोगराच्या शतकाच्या (१०६ धावा) जोरावर ३१० धावा उभारल्या आणि पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. दुसरा डाव दिल्लीने दुसऱ्या डावात २७७ धावा केल्या. यात त्यांना ३०० धावांचा टप्पा पार करता आला नाही. जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी १७९ धावांचे आव्हान होते. दुसऱ्या डावात वंशज शर्माने दहशत निर्माण केली. त्याने ६ विकेट घेतल्या. पहिल्या डावातील २ विकेटसह त्याने सामन्यात एकूण ८ विकेट घेतल्या. कामरान इकबालची नाबाद शतकी खेळी १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरने ७ विकेट राखून विजय मिळवला. कामरान इकबालने नाबाद १३३ धावा फटकावल्या आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवले. शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर तग धरून त्याने संघाला विजयाकडे नेले. संक्षिप्त स्कोअरकार्ड – दिल्ली पहिला डाव: २११ (आकिब नबी ५/३५) – जम्मू-काश्मीर पहिला डाव: ३१० (परास डोगरा १०६) – दिल्ली दुसरा डाव: २७७ (वंशज शर्मा ६ विकेट) – जम्मू-काश्मीर दुसरा डाव: १७९/३ (कामरान इकबाल नाबाद १३३*) – प्लेयर ऑफ द मॅच: आकिब नबी