छेडछाड अन् चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून खंडणी उकळणारे दोघे गजाआड

रांजणगाव गणपती – मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), विशाल नवनाथ ढेसले (वय ३१ रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे) अटक आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती-भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये फिर्यादी श्रीकांत तुकाराम शिंपले (वय २५ मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे) यास आरोपी सुमित लक्ष्मण थोरात व प्रविण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेवुन काठीने मारहाण केली आणि त्या ठिकाणी एका मुलीस बोलावुन घेवून तू हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी देवून २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
त्यानंतर त्याच्याकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम फिर्यादीस पाठविण्यास सांगीतली. सदरची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम त्याचे साथीदार आरोपी विशाल नवनाथ देसले व अभय रामटेके सर्व (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचे मदतीने संगनमत करुन घेतली आहे. याप्रकरणी श्रीकांत शिंपले याच्या तक्रारीवरुन रांजणगाव पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना समजताच त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत तात्काळ तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. तपास पथकाने घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळून आरोपीचा सहभाग निष्पन्न करुन आरोपी नामे सुमित लक्ष्मण थोरात, विशाल नवनाथ ढेसले यांना ३ सप्टेंबर २०२३ रोजी २:३० वाजता अटक करण्यात आलेली असून त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता शिरुर न्यायालयाने आरोपीना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
तपास पथकाने अटक केलेल्या आरोपीकडुन खंडणी स्वरुपामध्ये फिर्यादी कडुन घेतलेली २५ हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी प्रविण जगताप आणि अभय रामटेके यांचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभागाबाबत खात्री करुन पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.
पत्रकार असल्याचे सांगत उकळली खंडणी –
यातील अटक आरोपी सुमित लक्ष्मण थोरात हा रांजणगाव गणपती येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे तसेच त्याच्या पोलीसांशी ओळखी आहेत असे फिर्यादीस सांगून त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्यांची भिती दाखवत खंडणीची मागणी करत २५ हजार रुपये खंडणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.





