Ranjangaon News : तिहेरी हत्याकांडाने रांजणगाव हादरलं!

खंडाळे : रांजणगाव हद्दीत (तालुका शिरूर) येथे दोन लहान बालक व एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पथकासह सदर ठिकाणी दाखल होऊन घटना स्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. व अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खंडाळे तालुका शिरूर येथे एक नागरिक ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूने खंडाळे गावाकडे येत असताना त्याला हे अर्धवट जळालेले मृतदेह दिसले. या नागरिकाने सदर हकीगत खंडाळे गावच्या पोलीस पाटील सीमा पंडित खेडकर यांना सांगितली. सीमा खेडकर यांनी आपले पती पंडित खेडकर यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली व लगेच पोलिसांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , महिला पोलीस अधिकारी सविता काळे, व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये वीस ते पंचवीस वर्षे वयाची महिला, साडेतीन ते चार वर्षे वयाचा मुलगा, व एक दीड वर्षाचा मुलगा असे मयत झाले आहे. या सर्व मयतांचे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, खंडाळ्याच्या पोलीस पाटील सीमा खेडकर, रांजणगावच्या पोलीस पाटील सारिका पाचुंदकर व पोलीस कर्मचारी यांनी सदर घटना स्थळाचा पंचनामा केला.या वेळी श्वान पथक,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला पाहणी करत आरोपी बाबत काही पुरावा सापडतो का याची पाहणी केली. व मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आले आहेत.या मृतदेहातील महिलेच्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ” जय भीम “असे गोंदण्यात आलेले आहे
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलीस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.





