प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – काही महार वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या जमिनींवर पुण्यातील भोसले सहकारी बँकेचा बोजा असताना आणि सध्या ही बँक बंद असतानाही हे व्यवहार पार पडल्याने स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. महार वतन जमिनींच्या हस्तांतरणासाठी शासनाने अत्यंत कठोर कायदेशीर अटी आणि परवानग्या बंधनकारक केल्या आहेत. मात्र, रांजणगाव येथील काही व्यवहारांमध्ये या कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तक्रारदारांच्या दाव्यानुसार, काही ठिकाणी आवश्यक शासकीय परवानगीशिवाय व्यवहार झाले असून कागदपत्रांमध्येही मोठी विसंगती आढळून येत आहे. काही जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे या संशयाला अधिक बळकटी मिळत आहे.विशेषतः भोसले सहकारी बँकेचा बोजा असलेल्या जमिनींचा व्यवहार झाल्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नागरिकांनी याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने अद्याप यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, चौकशीअंतीच खरी वस्तुस्थिती समोर येईल असे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे.