Ranjangaon MIDC – रांजणगाव एमआयडीसी परिसरात उद्भवलेल्या भीषण गॅस टंचाईमुळे औद्योगिक व्यवस्थेसह स्थानिक अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक गॅस पुरवठा अपुरा पडत असल्याने अनेक लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून, परिणामी कामगार मोठ्या प्रमाणावर गावाकडे परतत आहेत. यामुळे परिसरातील हॉटेल, किराणा दुकाने आणि भाड्याच्या खोल्यांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. गॅस टंचाईमुळे उत्पादनात घट झाल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या शिफ्ट बंद केल्या आहेत, ज्यामुळे शेकडो कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार नसल्यामुळे उद्योगांना आता कामगार टंचाईचाही सामना करावा लागत असून उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न ठप्प झाले आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या मते, मेस, हॉटेल आणि किराणा दुकानांचा रोजचा गल्ला निम्म्यावर आला आहे. तसेच, कामगारांच्या पलायनामुळे अनेक भाड्याच्या खोल्या ओस पडल्या असून घरमालकांचे उत्पन्नही बुडाले आहे. उद्योजकांनी भीती व्यक्त केली आहे की, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी होत असून आर्थिक तोटा वाढत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा एमआयडीसीचे औद्योगिक चक्र कायमचे थांबेल, असा इशारा सर्व स्तरांतून देण्यात येत आहे.