प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे आगामी भाद्रपद गणेशोत्सव २०२५ संदर्भातील नियोजन बैठक महागणपती मंदिरातील दिवाणखाना सभागृहात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील यांनी केले.मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनी बैठकीचे प्रास्ताविक करताना यात्रा काळातील विविध बाबींचा आढावा घेतला. यामध्ये दर्शन रांग व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, द्वारकरी दर्शनपास व्यवस्था, गावकरी दर्शन रांग व्यवस्था, पालखी मार्ग दुरुस्ती इत्यादी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाद्रपद यात्रा रविवार (दि. २४ ऑगस्ट) ते शनिवार (दि. ३० ऑगस्ट) दरम्यान सात दिवस चालणार असून, या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार (दि. २४) रोजी पहाटे तीन वाजता मंदिर उघडण्यात येईल. सकाळी अकरा वाजता पूर्वद्वारातून यात्रेनिमित्त पालखी प्रस्थान होईल. सायंकाळी पाच वाजता दर्शन बंद करून गुरूवारी (दि. २८ ऑगस्ट) पंचमीच्या दिवशी मंदिर सकाळी सहा वाजता उघडले जाईल आणि मुक्क्तद्वार दर्शन सकाळी दहा वाजता बंद होईल.या बैठकीस सामाजिक सुरक्षा विभाग, बांधकाम, महसूल, आरोग्य, महावितरण, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग अशा सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच संपूर्ण प्रशासन सज्ज असून, भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त ओंकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, माजी अध्यक्ष बबनराव कुटे, डॉ. अंकुश लवांडे, व्यवस्थापक बाळासो गोहे, पांडुरंग चोरगे, ग्रामपंचायत व सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी आभार मानले.