प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती परिसरात स्मशानभूमीसमोर, सोनेसांगवी रस्त्यावर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडीची घटना समोर आली आहे. या चोरीत तब्बल ५ लाख २९ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.याबाबत नीलम पांडुरंग तोडकर (वय ४८, रा. रांजणगाव गणपती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी कुटुंब भाऊ अरुण ऐरंडे यांच्या दशक्रिया विधीसाठी वडझिरे (ता. पारनेर) येथे गेले होते. बुधवारी (दि. २६) दुपारी १२:१५ वाजता मुलगा सुयश घरी परतल्यावर घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप तुटलेले, कपाटे उघडी आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटात व टेबलांमध्ये ठेवलेली ४९,००० रुपये रोख रक्कम, तसेच चार तोळ्यांचे गंठण, सोन्याच्या अंगठ्या आणि मिनी गंठण मिळून एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. चोरट्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.