कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे याना करण्यात आलेल्या अटकेवर श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. विक्रमसिंघे यांना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी देशातील प्रमुख पक्षांचे नेते एकत्र आले. विक्रमसिंघे यांना झालेली अटक असंवैधानिक आणि राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कृतीचे उदाहरण असल्याची टीका विरोधकांनी कोलंबो येथे एक संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आपल्या देशामध्ये खुली लोकतांत्रिक प्रक्रिया राबवली जाते, असे माजी अध्यक्ष मैथ्रिपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे. सिरीसेना हे जानेवारी २०१५ पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत देशाचे अध्यक्ष राहिले होते. माजी अध्यक्षांना अशा प्रकारे अटक केली जाणे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्याविरोधात आहे, असे ते म्हणाले.विक्रमसिंघे यांच्या राजकारणापेक्षा आपल्या पक्षाच्या मतांमध्ये फरक आहे. पण दडपशाहीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जाण्याला आम्हाला विरोध करावाच लागेल, असे श्रीलंका पीपल्स फ्रंटचे सरचिटणीस सगारा कारियावासाम यांनी म्हटले आहे. दरम्यान विक्रमसिंघे यांना काल तुरुंगातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. विक्रमसिंघे अजूनही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच आहेत, असे कोलंबो नॅशनल हॉस्पिटलने आज सांगितले. त्यांच्या प्रकृतीवर देखरेख केली जात असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. रुकशान बेल्लाना यांनी सांगितले. विक्रमसिंघे यांना न्यायालयात १० तास थांबावे लागले होते. त्या काळात त्यांना डिहायड्रेशनचा त्रासस झाला. आता इतर व्याधींपासून होणारा त्रास थांबवण्यासाठी त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रमसिंघे यांना आणखी किमान तीन दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागेल. मंगळवारी त्याना न्यायालयात हजर केले जाऊ शकणार नाही. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाला न्यायालयात नेले जाऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारी निधीतून खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ब्रिटनचा प्रवास करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप विक्रमसिंघे यांच्यावर आहे.