मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील तर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचे ते काका होते. देब मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील, अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जीचे काका देब मुखर्जी यांचे आज होळीच्या दिवशी निधन झाले. अयान मुखर्जीचे वडील आता या जगात नाहीत. त्यामुळे सणाच्या दिवशीच मुखर्जी कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे.देब मुखर्जी यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देब मुखर्जी काही काळापासून खूप आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. देब मुखर्जी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 60 आणि 70 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी ‘तू ही मेरी जिंदगी’, ‘आँसू बन गये फूल’, ‘अभिनेत्री’, ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘कमिने’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनय शैलीची तुलना त्यांचे बंधू जॉय मुखर्जी आणि शम्मी कपूर यांच्याशी केली जात असे, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.मात्र तरीदेखील त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.