केडगाव -खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या रोकडबानाथ विद्यालय भांडगावचे कलाशिक्षक सुभाष नारायण फासगे यांनी रांगोळीचा वापर करून काढलेल्या चित्रातून देशातील करोना योद्ध्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे; परंतु या कठीण काळातही सर्वधर्म समभाव असणाऱ्या या देशातील डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, ड्रायव्हर, आशा वर्कर्स, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी आणि सैनिक, तसेच अनेक सामाजिक संघटना आपला जीव धोक्यात घालून करोनाविरुद्ध लढत आहेत. “घरात राहा, सुरक्षित राहा’, असा मूलमंत्र नागरिकांना देत आहेत. या सर्वांविषयी देशवासीयांच्या मनात आपलेपणा निर्माण झाला असून त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल नागरिक अनेक ठिकाणी फुले उधळून त्यांना मानवंदना देत आहेत.
भांडगाव विद्यालयाचे कलाशिक्षक सुभाष फासगे यांनी देखील चार दिवस, पाच तास काम करून स्वतःच्या घरात रांगोळीच्या सहाय्याने चित्र रेखाटून करोनाचा सामना करणाऱ्या योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.