अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आले आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईवरून अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने रंगोलीवर उपरोधिक टोला लगावला आहे.
रंगोली आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप, टिकाटिप्पणी करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केले. गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत आली होती. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे, असे म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
दरम्यान, रंगोलीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी धन्यवाद ट्विटर. ती काही ठराविक समुदायांना लक्ष करत होती. त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत होती. अशा आशयाचे ट्विट फराह खान अली हिने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर रंगोली व कंगना राणावत या दोघींची नावं ट्रेण्ड होत आहेत. काहींनी रंगोलीला पाठिंबा देत तिची काय चूक आहे, असा प्रश्न विचारला तर काहींनी तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.