चंदीगड : काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शुक्रवारी हरियाणातील अरवली प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध खाणकामावर तीव्र टीका करताना या खाणकामामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून राज्याच्या तिजोरीचेही मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यसभा खासदार सुरजेवाला म्हणाले की, खाण माफिया राजकीय संरक्षणाखाली सार्वजनिक संसाधनांची खुलेआम लूट करत असून अरवली टेकड्यांचा नाश करत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या खुलाशानुसार, दादुम टेकड्यांमधील अवैध खाणकामामुळे पर्यावरणीय हानीबरोबरच सरकारी तिजोरीची सुमारे १,२०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. तोशाम परिसरात खाणकामाशी संबंधित अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असे त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चरखी दादरी जिल्ह्यातील अरवली टेकड्यांमधील सुमारे ३८३ हेक्टर क्षेत्र अवैध खाणकामामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून रात्रभर सुरू असलेल्या खाणकामामुळे स्थानिक नागरिक दहशतीत जगत आहेत, असा आरोप त्यांनी केला.अवजड यंत्रसामग्रीच्या कंपनामुळे घरांना तडे जात असून भूकंपासारखे धक्के जाणवत असल्याच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे, असे सुरजेवाला म्हणाले. अवैध खाणकाम रोखण्यात अपयश आल्याबद्दल आणि पर्यावरण तसेच नागरिकांचे जीवन धोक्यात घातल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.