रामटेक लोकसभा मतदारसंघ : तुमाने विरुद्ध गजभिये

रामटेक लोकसभा मतदारसंघ प्रकाशात आला तो माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यामुळे. त्यांनी येथून दोन वेळा निवडणूक लढवली. या मतदारसंघातून आठ वेळा कॉंग्रेस आणि चार वेळा शिवसेना निवडून आली आहे. याही वेळा शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यातच थेट लढत आहे आणि दोघांनाही ही निवडणूक सारखीच आव्हानात्मक आहे.

मटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे आणि यावेळी इथे शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट लढत आहे. अर्थात बसपचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण रोडगे (पाटणकर) हेही निवडणूक रिंगणात आहेत. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली, 1984 आणि 1989 मध्ये. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक हे सहा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतात. 1977 पासून येथे कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

कॉंग्रेसने या लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा निवडणूक जिंकली तर शिवसेनेच्या उमेदवाराला चार वेळा निवडणूक जिंकता आली. 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते या मतदारसंघातून निवडून आले होते. नंतर 2006 मध्ये नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर सुबोध मोहिते यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2007 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी त्यांचा 32 हजारहून अधिक मतांनी पराभव केला. 2009 मध्ये कॉंग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने येथून निवडून आले. यावेळी शिवसेनेने पुन्हा तुमाने यांनाच उमेदवारी दिली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. येथे शेतीच्या समस्या आहेत. त्यामुळे इथे मोदी लाट नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. रामटेक जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण इतर तालुक्‍यांतही दुष्काळी स्थिती आहेच. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा, नुकसान भरपाई हे इथल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघात सुमारे 1700 गावे आहेत. कॉंग्रेसच्या गोटात यावेळी गोंधळाचे वातावरण होते. यावेळी मुकुल वासनिक यांची ही निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यांच्या समर्थकांनीही त्यासाठी जोर लावला होता. पण कॉंग्रेसमधल्या इतर गटांनी त्यांना जोरदार विरोध केला, तेव्हा त्यांनी आपणहूनच माघार घेतली. कॉंग्रेसचे नितीन राऊतही उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांचीही निराशा झाली. किशोर गजभिये बहुजन समाज पक्षातून कॉंग्रेसमध्ये आले आणि त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.

आता मोदी लाट नाही याचा आनंद कॉंग्रेस कार्यकर्त्यांना होता, पण आता आपल्या नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज झालेत आणि त्यांचे मनोबलही खचले आहे, अशा बातम्याही येत आहे.

किशोर गजभिये हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये समाजकल्याण विभागात सचिव म्हणून काम केले आहे. 2010 मध्ये गजभिये यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि खासगी क्षेत्रात काम सुरू केले आणि नंतर ते राजकारणात आले. गेल्या वर्षी त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बसपतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

गजभिये यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर नितीन राऊत यांनी थयथयाट करायचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. दिल्ली पक्षश्रेष्ठींनी आपल्यालाही निवडणूक अर्ज भरायला सांगितला आहे, असे ते सांगत होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. गजभिये यांच्या नावाची अशोक चव्हाण यांनी जोरदार शिफारस केली. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली, पण यामुळे कॉंग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला.

हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी येथे जातीचे समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे. रामटेक मतदारसंघात आणि पूर्व विदर्भात तेली समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. कॉंग्रेसने या समाजातून कुणाला उमेदवारी दिली नाही आणि चंद्रपुरात विनायक बांगडे यांना दिली होती, पण ती काढून घेण्यात आली. कॉंग्रेसला याचा फटका बसू शकतो, असे राजकीय विचारवंतांचे म्हणणे आहे.

शिवसेनेचे कृपाल तुमाने लोकप्रिय खासदार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते लोकांमध्ये, खेड्यापाड्यांत थेट संपर्क ठेवत आहेत. भाजपनेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे प्रचारात सध्या तरी तुमाने यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते.
बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी येथे निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही पक्षांचे मतदार एकच आहेत. तिसऱ्या स्थानावर येणारा बहुजन समाज पक्ष सर्वसाधारणपणे मते फोडण्याचे काम करतो. साधारणपणे कॉंग्रेस आघाडीला असा मतविभागणीचा फटका बसतो. यावेळीही या दोन पक्षांकडे जाणाऱ्या मतांमुळे तुमाने यांची मते कमी होतील असे कॉंग्रेसला वाटत आहे. पण तुमानेंची कमी झालेली मते कॉंग्रेसच्या खात्यात जातील याची शाश्‍वती नाही. या दोन पक्षांचे महत्त्व इथे दिसून येणार आहे. वंचित बहुजन आघाडीला जी मते मिळतील ती कॉंग्रेसच्याच खात्यातील असतील, असेही काही राजकीय विचारवंतांना वाटते. थोडक्‍यात या दोन पक्षांच्या अस्तित्वाचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो.

एकूणच रामटेक लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.