Satara | रामराजेंनी जे केलय ते भोगावेच लागेल

वडूज, (प्रतिनिधी) – रामराजे एक नंबरचे गद्दार आहेत. लोकसभेला महायुतीशी गद्दारी करुन ते सरकारकडून अपेक्षा ठेवत आहेत. महायुतीत असूनही ते शरद पवारांचे गुणगाण गात आहेत.
त्यांच्या नसानसात बेईमानी आहे. त्यांना करारा जवाब मिळणार आहे. त्यांनी आजपर्यंत जे केलय ते भोगावेच लागणार आहे असे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
वडूज येथे पत्रकारांशी बोलताना आ. गोरे पुढे म्हणाले, वीस वर्षे मंत्री, सात वर्षे सभापती आणि २७ वर्षे सत्तेत असणाऱ्या रामराजेंना आमची भीती वाटू लागली आहे.
मी मंत्री नसताना, फक्त आमदार असताना त्यांच्याशी १५ वर्षे लढाई लढताना कधी रडलो नाही. ते आत्ताही सत्तेत असताना आमचा सामना करु शकत नाहीत असे म्हणत आहेत. यावरुन ते किती कमजोर आहेत ते समजते. त्यांनी काळजी करु नये.
जयकुमार कधीही चुकीचे पाऊल उचलणार नाही. ज्या रामराजेंनी आयुष्यभर दुसऱ्यांवर केसेस घातल्या त्याच रामराजेंना आता भीती वाटायला लागली आहे.
त्यांच्यावर केसेस घालून त्यांचे राजकारण आम्ही संपवतो की काय, असे त्यांना वाटायला लागले आहे. अशा सरकारमध्ये राहून करायचे काय असे वक्तव्य ते करु लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आडून ते तुतारीकडे निघाले आहेत. ते एक नंबरचे गद्दार आहेत.
आ. गोरे म्हणाले, रामराजेंनी जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित केले होते. त्यांनी ठरवलेले शहा यांचे निमंत्रण थांबविण्याइतका मोठा कार्यकर्ता मी नाही. रामराजे तसे समजत असतील तर ते माझा सन्मान करत आहेत.
अमित शहांनी उभा केलेला माढ्यातील उमेदवाराचा पराभव करताना त्यांना भाजपची आठवण आली नव्हती. ते आत्ता जी वक्तव्ये करत आहेत ते करताना त्यांनी थोडीतरी लाज बाळगावी.
माण – खटाव मतदारसंघात वेगवेगळ्या डीएनए चे कितीही विरोधक एकत्र आले तरी माझा पराभव ते करु शकत नाहीत असेही आ. गोरेंनी शेवटी सांगितले.





