Ramesh Pardeshi | Raj thackeray : ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला ‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज दिसले. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्यांना काम करण्याची इच्छा नसेल, त्यांनी तातडीने आपलं पद सोडावं. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी रमेश परदेशी यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून चांगलंच फटकारलं होतं. काही दिवसांपूर्वी रमेश परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी याला कार्यकर्त्यांच्या समोर झापलं. “छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा..” असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर आता रमेश परदेशी यांनी माध्यमांशी बोलताना मनसे सोडण्याचे खरं कारण सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले, “त्या दिवशी शाखाध्यक्षांची अतिशय गोपनिय बैठक होती. तिथे राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी तुझं संघ वगैरे काय आहे असं विचारलं. त्यावर मी साहेब आहे, मी इथे १८ वर्षे जसं काम करतोय तसंच लहानपणापासून संघही आहे, असं म्हटलं. त्यावर त्यांनी मिश्किल पद्धतीने बंद करा रे.! असं म्हटलं. मलाही हाच प्रश्न पडला आहे की त्यांना आताच संघात असण्यावर आक्षेप का आला. कारण गेली २० वर्षे मी तुमच्याशी संबंधित आहे. आधीपासून माझ्या फेसबुकवर संघाच्या संचालनाचे फोटो दिसतील. इतके वर्षे फोटो असताना आताच का तो विषय निघाला हे कळत नाहीये. मला सुद्धा याची कल्पना नव्हती. राज ठाकरे बोलले त्याचे वाईट वाटले नाही कारण त्यांची ती पद्धत आहे आणि त्यांना तो अधिकार आहे,” असे रमेश परदेशी म्हणाले. “हे कुणी आणि का केलं हा प्रश्न मला पडला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असती तर मी समजू शकतो. पण तसलं काही नाही. पक्षाला माझ्याकडून जी मदत शक्य होती ती मी करत होतो. मला शिव्या दिल्या तरी फरक पडणार नाही. पण जो विचार तुमच्या बरोबर आहे, जे संस्कार तुम्ही घेऊन चालला आहात ते संघाचे आहेत. मग त्याच्यावर आल्यानंतर थोडा मी व्यवहार्य होणार ना. कारण मी एकटा स्वयंसेवक नाही. माझ्या कुटुंबातील लोकही संघाचे सदस्य आहेत. असं असतानाही मी मनसेसोबत काम करत होतो. माझ्या विचारांचा विषय होता म्हणून निर्णय घेतला,” असंही रमेश परदेशी यांनी म्हटलं.