शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त दाव्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी दावा केला होता की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर रविवारी कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना शिवसेना फुटण्यास परब हेच कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप केला. “पक्ष फुटला, सर्व लोक पक्षातून बाहेर पडले, याला हाच चमचा जबाबदार आहे. परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून आणले? त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांनाही अशीच माणसं आवडतात,” असं कदम म्हणाले. दरम्यान, अनिल परब यांनी कदम यांच्यावर डान्सबार प्रकरणावरून पुन्हा टीका केली होती. याला उत्तर देताना कदम म्हणाले, “तो डान्सबार नव्हता, फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्याला परवानगी होती. कदम कुटुंबाला बदनाम करण्यासाठी डान्सबार असा उल्लेख केला गेला. हे हॉटेल ३० वर्षांपासून आहे. एका तरुणीने विक्षिप्त हावभाव केल्याने मी त्या शेट्टीला काढले आणि परवाना रद्द केला. दीड महिन्यांनी परब यांना झोपेतून जाग आली. मुलींचे पैसे खाणारा मी नाही.” याशिवाय, कदम यांनी विलेपार्ले येथील एसआरए योजनेचा मुद्दा उपस्थित करत परब यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “एसआरए योजना अजून पूर्ण झालेली नाही. माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे की, अनिल परब यांनी ८ हजार मराठी माणसांना घर खाली करण्याची धमकी दिली.” या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून, येत्या काळात याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे.