प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत १७ ते १८ तर पुणे महापालिकेत २० जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात महायुतीकडून भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या नेत्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. पुणे महापालिकेसाठी वीस प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भारतीय जनता पक्षाकडे सोपविण्यात आली आहे. उच्च व शिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी दिली आहे. महार वतनाच्या जमिनी हडपल्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील महार वतनाची जमीन खरेदी केल्याच्या प्रकाराबद्दल आठवले म्हणाले, महार वतनाच्या जमिनी विकण्याचा अथवा विकत घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे असतानाही राज्यभरात महार वतनाच्या अनेक जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमावी. या समितीने एका महिन्यात आपला अहवाल द्यावा. राज्य सरकारने स्थानिकांच्या हिताचा निर्णय जमिनींबाबत घ्यावा. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहे.