Ramdas Athawale : विरोधकांनी सीमांकन विधेयकाला पाठिंबा द्यावा; रामदास आठवले यांचे आवाहन
प्रस्तावित सीमांकन प्रक्रियेचा फायदा केवळ भाजपलाच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांना होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

Ramdas Athawale : प्रस्तावित सीमांकन प्रक्रियेचा फायदा केवळ भाजपलाच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांना होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
काश्मीर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेतील जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. यामुळे २७३ हून अधिक जागा महिलांसाठी उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या जागा पाचवरून सात किंवा आठ, तर विधानसभा जागा ९० वरून १३५ ते १४० पर्यंत वाढू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
मागील सीमांकनाचा फायदा केवळ भाजपला झाल्याचा नॅशनल कॉन्फरन्सचा आरोप त्यांनी फेटाळला. जागा वाढल्याने सर्व पक्षांना संधी मिळेल आणि विजयी उमेदवार कोण असेल, हे मतदार ठरवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधेयकांना दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत करत आठवले यांनी त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते, असे ते म्हणाले. पवार यांनी २०१९ मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर २०२२ मध्ये राष्ट्रपती होऊ शकले असते, असा दावाही त्यांनी (Ramdas Athawale) केला.






