पुणे – भारतीय रेल्वेच्या माध्यमातून 18 दिवसांची रामायण यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सर्व प्रमुख ठिकाणांचे दर्शन याद्वारे भाविकांना घेता येणार आहे. ही एक्स्प्रेस दि. 7 एप्रिल रोजी दिल्लीच्या सफदरजंग टेशन येथून सुटणार आहे. तीर्थस्थळ पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांतून ही सुविधा रेल्वे प्रशासन पुरवत आहे. “एक भारत श्रेष्ठ भारत’ हा दृष्टीकोन समोर ठेवून या “भारत गौरव’ ट्रेन्स धावत आहेत. देशात आतापर्यंत अशा 26 गौरव ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रामायण एक्स्प्रेस ही पूर्णपणे वातानुकूलित असून, त्यात फर्स्ट आणि सेकंड एसी असे पर्याय देण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये सेकंड एसी प्रवासासाठी प्रति व्यक्तीसाठी 1,14,065 रुपये आणि प्रथम श्रेणी एसीसाठी 1 लाख 46 हजार 545 रुपये प्रवास भाडे असेल. यासोबतच निवास, भोजन आणि प्रवास विमा सुविधाही याद्वारे दिली जात आहे. प्रवासाचे टप्पे आणि दर्शन स्थळ आयोध्या : राम जन्मभूमि मंदिर, हनुमानगढी, शरयू घाट नंदीग्राम : भरत-हनुमान मंदिर आणि भरत कुंड जनकपूर (नेपाळ) : राम-जानकी मंदिर सीतामढी : सीतामढी आणि पुनरौरा मंदिर बक्सर : राम रेखा घाट, रामेश्वरनाथ मंदिर वाराणसी : तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती. प्रयागराज : भारद्वाज आश्रम, संगम श्रृंगवेरपूर: श्रृंग ऋषि समाधि आणि शांतादेवी मंदिर, राम चौरा. चित्रकूट : गुप्त गोदावरी, रामघाट नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी, सीता गुफा, काळाराम मंदिर. हम्पी : अंजनद्री डोंगर, विठ्ठल मंदिर रामेश्वरम : रामनाथस्वामी मंदिर, धनुषकोडी भद्राचलम : श्री सीताराम स्वामी मंदिर, अंजनी स्वामी मंदिर आदी ठिकाणांना ही ट्रेन जाणार आहे.