मुंबई – रामजन्मभूमी मंदिराची उभारणी हा भगव्यावर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आणि आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमीची जागा खरेदी करण्यात काही गैरव्यवहार झाला असेल, तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि अन्य नेत्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
ते म्हणाले, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे या मुद्द्यावर आज सकाळी माझ्याशी बोलले. त्यांनी दिलेलले पुरावे धक्कादायक आहेत. भगवान राम आणि राम मंदिराच लढा आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहे. काही जण त्याला राजकीय मुद्दा बनवतात.
जर या मंदीर न्यासावर गैरव्यवहाराचे काही आरोप होत असतील तर त्यांनी त्याची उत्तरे दिली पाहिजेत. या मंदिराच्या भूमिपूजनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते. त्यांनीही या विषयावर बोलले पाहिजे.
जर विश्वासाने गोळा केलेल्या पैशाचा गैरवापर होत असेल तर ठेवलेल्या विश्वासाला काय किंमत? आम्हाला नेमकं काय घडतंय ते समजले पाहिजे. हे आरोप खरे आहेत का खोटे याचा उलगडा आम्हाला झाला पाहिजे.
हे आहेत आरोप
आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे माजी मंत्री पवन पांडे यांनी आरोप केला की, श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी जन्मभूमीसाठी 2 कोटी रुपयांची जागा 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या आरोपामुळे हे वाटळ उठले आहे. राय यांनी हे आरोप जोरदारपणे फेटाळले आहेत. सिंग आणि पांडे यांनी हे मनी लॉन्ड्रींगचे प्रकरण असून त्याच्या सीबीआय आणि इडीकडून चौकशीची मागणी केली आहे.