थायलंड रॅलीत संजय टकले चौथ्या स्थानी

पुणे – पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने थायलंडमधील टीडब्ल्यूसी क्रॉस कंट्री रॅलीत त्याने टी 1 गटात चौथे, तर एकूण क्रमवारीत सहावे स्थान मिळविले. ही रॅली कांचनाबुरी प्रांतात पार पडली. या रॅलीत संजय टकलेने डेलो स्पोर्ट टीमने सुसज्ज केलेली नवी ईसुझू युटीलीटी कार चालविली. इत्तीपोन सिमाराक्‍स हा त्याचा नॅव्हीगेटर होता. टी1 हा गट व्यावसायिक स्पर्धकांचा होता. त्यात मुक्तपणे तसेच मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बदल करण्यात आलेल्या कार होत्या. त्यामुळे पहिल्या पाच स्पर्धकांना करंडक देण्यात आले.

पहिल्या दिवशी संजयने पहिली स्पेशल स्टेज 2 मिनिटे 40 सेकंद पेनल्टीसह पूर्ण केली. त्यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर होता. आघाडीवरील एल. सुवात याच्यापेक्षा तो केवळ दोन सेकंदांनी मागे होता. त्यावेळी त्याला चांगली संधी होती. सर्व्हिस झाल्यानंतर जंगलातील मार्गातून दिर्घ स्टेज होती. याठिकाणी थायलंडचे लष्कर युद्धाचा सराव करते.

स्टेज सुरु होणार असतानाच मुसळधार पावसाला सुरवात झाली. पहिले दहा किलोमीटर संजयचा वेग चांगला होता. त्यानंतर वेग वाढविण्याच्या प्रयत्नात असतानाच पाऊसही वाढला. जंगलातील मार्ग वळणा-वळणांचा होता. त्यातच 30 कि.मी.च्या टप्प्यास इत्तीपोन डावीकडचे एक छोटे वळण चुकला. त्यामुळे सुमारे दहा मिनिटे व्यर्थ गेली. रॅलीच्या मार्गाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेनुसार पुढचे वळण जुळले नाही. त्यामुळे ते मागे फिरले.

पावसामुळे आधीच्या मार्गावरील टायरच्या खुणाही दिसत नव्हत्या. वेळ भरून काढण्यासाठी संजयने कार जोरात चालविली, पण एका खड्यापाशी कार सुमारे 70 अंशापर्यंत उचलली गेली. त्यात स्टीअरिंग निसटले, पण संजयने ते कसेबसे परत बसविले. अखेर मार्ग मिळाल्यानंतर त्याने रॅली पुढे सुरु केली. ती स्टेज त्याने पूर्ण केली.

दुसऱ्या दिवशी सस्पेन्शन सहा किलोमीटरनंतर तुटले. त्यातच मार्गही चुकला. पाच मिनिटे वाया गेल्यानंतर पुन्हा मार्ग मिळाला. सस्पेन्शन बसविल्यानंतर संजयने ही स्टेज पूर्ण केली. दोन दिवसांमधील विलंबामुळे त्याची आणखी वरचा क्रमांक मिळविण्याची संधी हुकल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.