रक्षाबंधन 2025: आज फक्त साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; भद्रा काल टळल्याने सकाळपासून दुपारपर्यंत राखी बांधणे उत्तम

Rakshabandhan 2025: आज भावंडांच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा होत आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. त्याबदल्यात भाऊ बहिणीला आयुष्यभर संरक्षण, आधार आणि प्रेम देण्याचं वचन देतो.
मात्र, यंदा राखी बांधण्यासाठी अख्खा दिवस उपलब्ध नसून फक्त ७ तास ३७ मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे. ज्यात राखी बांधल्यास ते अत्यंत मंगल मानलं जात आहे.
शुभ मुहूर्त कधी?
यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:४७ वाजता सुरू झाला आहे आणि दुपारी १:२४ वाजेपर्यंत राहणार आहे. या वेळेत राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जात आहे. दुपारनंतरचा काळ मुहूर्तात येत नसल्याने भावंडांनी सकाळपासूनच सण साजरा करण्याचा सल्ला पंडितांनी दिला आहे.
भद्रा कालाचा अडथळा नाही
शास्त्रांनुसार, भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते, कारण हा काळ वाद, अशांतता आणि अडथळा आणणारा मानला जातो. विशेषतः राखी बांधणे या काळात अशुभ मानले जाते. यंदा भद्रा काल ८ ऑगस्ट दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्ट पहाटे १:५२ वाजता संपला आहे. त्यामुळे आज राखी बांधताना भद्रा काळाचा अडथळा नाही, हा सण निर्धोकपणे आणि मंगल वातावरणात साजरा करता येणार आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर , राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत आहे. म्हणजेच एकूण वेळ ७ तास ३७ मिनिटे आहेत.
कारण भद्रा काल संपल्याने अडथळा नाही. त्यामुळे भावंडांनी सकाळीच राखी बांधून सण साजरा कराव .
यंदा शनिवार-रविवारची सुटी मिळाल्यामुळे अनेक भावंडं एकत्र जमून आनंदाने रक्षाबंधन साजरा करत आहेत. सकाळपासूनच बाजारात, घरी आणि सोशल मीडियावर सणाचा उत्साह दिसत आहे.

