“बटोगे तो लुटोगे’, राकेश टिकैत यांचे शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन

कर्नाल – हरियाणा-पंजाब सीमेवर शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा सोमवारी २१ वा दिवस होता. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. बटोगे तो लुटोगे, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी या प्रमुख मागणीसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत दिल्लीकडे कूच करण्याचे ठरवले. मात्र, सुरक्षा दलांकडून रोखण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तेव्हापासून सीमेवर मुक्काम ठोकला आहे. मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबरपासून सीमेवरील खनौरी या ठिकाणी उपोषण सुरू केले.
काही दिवसांपूर्वी त्यांची भेट टिकैत यांनी घेतली. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांकडून संयुक्त किसान मोर्चाला (एसकेएम) आंदोलनात सहभागी होण्याचे साकडे घालणारे पत्र पाठवण्यात आले. त्या पत्राविषयीचा प्रश्न पत्रकारांनी टिकैत यांना विचारला. उत्तरादाखल त्यांनी शेतकऱ्यांमध्ये एकजुट असण्याच्या गरजेवर भर दिला. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र बसून बोलायला हवे. मागील काही महिन्यांपासून आम्ही ती भूमिका मांडत आहोत, असेही ते म्हणाले.





