Rakesh Tikait : विरोधकांनी सर्व राज्यांत महारॅली घ्याव्यात; राकेश टिकैत यांचे आवाहन
विरोधकांनी दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले. तशाच धर्तीवर सर्व राज्यांत महारॅली घ्याव्यात. त्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केले.

Rakesh Tikait : विरोधकांनी दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले. तशाच धर्तीवर सर्व राज्यांत महारॅली घ्याव्यात. त्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केले. विरोधी पक्षांनी त्यांची मोहीम देशाची राजधानी दिल्ली पलिकडेही न्यावी. त्यासाठी देशभरातील जनतेला संघटित करावे.
देशाला वाचवण्यासाठी वैचारिक क्रांती गरजेची आहे, असे टिकैत (Rakesh Tikait) पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीलाही (सीजेपी) पाठिंबा दर्शवला. देशाचे राजकारण आणि सरकार बदलण्यासाठी तरूणाई महत्वाची भूमिका निभावू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांची इंडिया आघाडी कथित मतचोरी विरोधातील लढा तीव्र बनवण्यास उत्सुक आहे.
त्या उद्देशातून रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित करण्यात आली. त्यामध्ये प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला. त्यामुळे कथित मतचोरी विरोधातील लढ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्या लढ्यात सामान्य जनतेला, विविध समाज घटकांना सामावून घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे टिकैत (Rakesh Tikait) यांनी मांडलेल्या भूमिकेचे महत्व वाढले आहे.






