मुजफ्फरनगर जन आक्रोश रॅलीत राकेश टिकैत यांच्यावर हल्ला

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे शुक्रवारी आयोजित जन आक्रोश रॅलीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाउन हॉल मैदानात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, टिकैत सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रॅलीदरम्यान, टिकैत मंचावर असताना काही आंदोलकांनी त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. याचवेळी एका तरुणाने टिकैत यांच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे त्यांची पगडी खाली पडली आणि धक्क्याने ते पडण्यापासून थोडक्यात बचावले. सुरक्षारक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हल्लेखोराला बाजूला केले. टिकैत यांना गंभीर दुखापत झाली नसली, तरी त्यांच्याकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित या रॅलीत अनेक हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. बाजार बंद ठेवून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. काही गटांनी टिकैत यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतल्याने विरोध तीव्र झाला. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अलिकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खऱ्या गुन्हेगारांवर आणि त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान जारी केल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.





