राकेश झुनझुनवाला यांचे निधन; कोण होते झुनझुनवाला ?

पुणे – राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत… शेअर मार्केट विश्वाचे सम्राट समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 1960 साली हैदराबाद येथे झाला. त्यानंतर त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. सिडनेहॅम कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटसमध्ये दाखल झाले. त्यांचा विवाह शेअर मार्केट तज्ज्ञ रेखा झुनझुनवाला यांच्याशी झाला. ते स्वत:ची रेअर एंटरप्राईजेस नावाची स्टॉक ट्रेडिंग फर्म चालवायचे.
शेअर मार्केट व्यवहारात त्यांनी अब्जावधी रुपयांची मालमत्ता जमवली. ते ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे त्या शेअर्सचे भाव लगेचच गगनाला भिडायचे. कंपन्यांच्या व्यवसायांचा आणि त्यांच्या भवितव्याचा त्यांना अचूक अभ्यास असायचा. अनेक पडेल कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यातून त्यांनी पुढील काळात कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला. आंतरराष्ट्रीय शेअर व्यवसायातही त्यांचा मोठा दबदबा होता.
त्यांनी अमाप संपत्ती कमावल्यानंतर ते अलीकडेच विमान वाहतूक क्षेत्रातही उतरले होते. त्यांनी अकसा विमान कंपनीही स्थापन केली आहे. सध्या विमान वाहतूक क्षेत्र तोट्यात चालले असताना त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले होते की, माझी या क्षेत्रात अपयशी होण्याचीही तयारी आहे.





